जीव धोक्‍यात घालून 'ते' इतरांना वाचवितात 

जीव धोक्‍यात घालून 'ते' इतरांना वाचवितात 

पुणे : अवघ्या 10 दिवसांपूर्वीची घटना. बदलापूरजवळील डोंगररांगात फिरायला गेलेले रेड्डी हे गृहस्थ तेथील एका सुळक्‍यावर तब्बल 18 तास अडकून पडले होते. त्यांना मदत करण्यासाठी "महाराष्ट्र माउंटिनीअर्स रेस्क्‍यू को-ऑर्डिनेशन सेंटर'च्या (एमएमआरसीसी) हेल्पलाइनवर एका व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर "एमएमआरसीसी'ची राज्यस्तरीय यंत्रणा सतर्क झाली. त्यांनी त्यांच्या पनवेलमधील गिर्यारोहकांशी संपर्क साधला, त्यांनीही अत्यंत अवघड ठिकाणाहून रेड्डींना सुखरूप खाली उतरविले. अशा पद्धतीने किल्ले, डोंगराळ व दुर्गभ भागात अडकलेल्या अनेकांची "एमएमआरसीसी'ने तत्काळ सुटका केली, एवढचे नाही, तर त्यांचे प्राणही वाचविले. आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेसारख्या मोठ्या अपघातातील मृतदेह बाहेर काढण्याचे धाडसी कामही याच गिर्यारोहकांनी केले. 

किल्ले, गड, डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण वाढले, तसतसे याच ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या अपघातांचेही प्रमाण वाढले आहे. अशावेळी त्या घटनांमधील व्यक्तीचा जीव वाचणे महत्त्वाचे असते. त्यासाठीच दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या संकल्पनेतून राज्याच्या कानाकोपऱ्यातील गिर्यारोहकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. अडीचशेहून अधिक गिर्यारोहक, किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांची बैठकही झाली. त्यामध्ये मदतीची गरज असणाऱ्यांना तत्काळ मदत पोचविण्यासाठी "महाराष्ट्र माउंटिनीअर्स रेस्क्‍यू को-ऑर्डिनेशन सेंटर'ची (एमएमआरसीसी) स्थापना करण्यात आली. त्यानंतर 24 तास उपलब्ध होणारी हेल्पलाइन सुरू करण्यात आली. त्याद्वारे लोकांना मदत करण्याचे काम सध्या सुरू आहे. 

मागील दोन वर्षांत "एमएमआरसीसी'च्या गिर्यारोहक सदस्यांनी उत्तराखंडमधील ढगफुटीपासून ते आंबेनळी घाटातील बस दुर्घटनेतील मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले आहे. सहा महिन्यांपूर्वी कर्जतजवळील पेब किल्ल्यावरून खाली कोसळलेल्या एका तरुणीचा शोध घेऊन गिर्यारोहकांनी तिचे प्राण वाचविण्याचे काम केले. आत्तापर्यंत 8 ते 10 घटनांमध्ये अनेकांचे प्राण वाचविले, तर 30 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले आहे. घटनास्थळी जलदगतीने पोचून जीव वाचविण्यावर गिर्यारोहक भर देतात. पुण्यातील कार्यालयातच हेल्पलाइन सेंटर असून, त्या ठिकाणी 4 स्वयंसेवकर रात्रंदिवस मदतीसाठी तत्पर असतात. 

राज्यस्तरीय नेटवर्क असल्याने घटनेनंतर लगेचच गिर्यारोहक घटनास्थळी पोचतात. घाटरस्ते, डोंगरदऱ्या, धरणांमधून अनेकदा मृतदेह बाहेर काढण्याचे कामही गिर्यारोहक स्वेच्छेने करतात. कोणत्याही प्रकारचे आर्थिक किंवा अन्य पाठबळ आम्हाला नाही. मात्र, लोकांची सेवा करण्यास मिळते, याचा आनंद सर्वांना आहे. 
उमेश झिरपे, समन्वय, एमएमआरसीसी 
 
* हेल्पलाइन क्रमांक - 7620230231 
* हेल्पलाइन 24 तास सुरू 

'एमएमआरसीसी'ची वैशिष्ट्ये 
* 300 हून अधिक गिर्यारोहक, ग्रामस्थ सदस्य 
* नैसर्गिक आपत्तीत मदत करण्याची ताकद 
* 108 च्या सहकार्यामुळे वैद्यकीय मदतही तत्काळ 

गरज आहे मदतीची ! 
* जीवरक्षक असल्याने त्यांचा विमा उतरविणे गरजेचे 
* उत्कृष्ट दर्जाची साधनसामुग्रीची आवश्‍यकता 
* चांगल्या पद्धतीचे प्रशिक्षण हवे 
* प्रथमोपचार पेटीची गरज 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com