मुक्त मी... स्वतंत्र मी! (प्रवीण टोकेकर)

मुक्त मी... स्वतंत्र मी! (प्रवीण टोकेकर)

‘आमिस्टाड’ हा चित्रपट बघताना गुलामांचं आयुष्य, त्यांचा छळ, वर्णविद्वेषाचा विखार, त्याला चढलेला मध्ययुगीन अमानुषतेचा रंग या साऱ्याचा एक विशाल पट उलगडत जातो. तो माणूस म्हणून कुणालाही अंतर्मुख करेल. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आपल्याला अल्पज्ञात इतिहास शिकवतोच आणि मानवी इतिहासाच्या या रांगेत आपण कुठं उभे आहोत, त्याची चिमटेदार जाणीवही करून देतो.


कोट्यवधी जगतात जिवाणू जगती अन मरती
जशी ती गवतांची पाती
नाविक आम्ही; परंतु फिरतो सात नभांखाली
निर्मितो नवक्षितिजे पुढती
मार्ग आमुचा रोधु न शकती ना धन ना दारा
घराची वा वीतभर कारा
निशाण मिरवू महासागरी
जिंकुनी खंड खंड सारा...

‘को  लंबसाचे गर्वगीत’ या कुसुमाग्रजांच्या काव्यरचनेतल्या या चिरस्मरणीय ओळी. या कवितेत केवळ कोलंबसाच्याच दुर्दम्य आकांक्षांचं सार साकळलेलं नाही, तर अखिल मानवाच्याही स्वतंत्र ऊर्मींचा तो एक ऊर्जस्वल उद्‌गार आहे. हे गर्वगीत गुणगुणताना हमखास ‘आमिस्टाड’ची आठवण होते. दीडेकशे वर्षांपूर्वीची, गुलाम म्हणून खरीदल्या-विकल्या-छळल्या-मारल्या जाणाऱ्या काही मूठभर खलाश्‍यांच्या मुक्तिलढ्याची कहाणी म्हणजे ‘आमिस्टाड’. एका जहाजावरच्या गुलामांनी पेटवलेल्या बंडाच्या ठिणगीनं पुढं क्रांतीचं रूप धारण करत गुलामीलाच कायमचं गाडून टाकलं, त्याची ही गर्वगाथा. त्यातली ऊर्मी ही कोलंबसाच्या आत्मविश्‍वासाइतकीच प्रखर आहे. 

सोळावं-सतरावं शतक होतं, तेव्हा गुलामी हा सर्वमान्य व्यापार होता. माणसानं माणसाची खरेदी-विक्री समाजमान्य मानली होती. अमेरिकेत तर त्याला लंबाचौडा इतिहास होता. सन १८३९ च्या सुमारास ‘ला आमिस्टाड’ नावाच्या एका स्पॅनिश जहाजावरच्या काही आफ्रिकी गुलामांनी क्‍यूबाजवळच्या पाण्यातच आपल्या पारतंत्र्याचे साखळदंड खळाखळा तोडत स्वातंत्र्याचा उद्‌घोष केला. ते खलाश्‍यांचं बंड तिथल्या तिथं चिरडलं गेलं; पण पुरतं संपलं नाही. या घटनेचे दूरगामी परिणाम अमेरिकेच्या अर्वाचीन इतिहासावर झाले. अमेरिकेच्याच का, जगाच्या पाठीवर झालेल्या अनेक विधायक-विघातक बदलांना ‘अमिस्टाड’ जहाजावरचं बंड कारणीभूत ठरलं. या अभूतपूर्व लढ्यावर आजवर लाखो पृष्ठं लिहिली गेली असतील. या बंडाची परिणती पुढं यादवी युद्धात झाली. उत्तर-दक्षिणेतल्या संघर्षात झाली. राजनैतिक संबंधांवर त्याचे दूरगामी परिणाम झाले; पण त्या लढ्यात तब्बल साडेसात लाख माणसं मारली गेली होती. ही त्या लढ्याची जबर किंमत आहे. सन १८६१ ते ६५ अशी चार वर्षं हे यादवी युद्ध सुरू होतं. त्यातूनच पुढं जन्म झाला तो मानवी स्वातंत्र्याच्या स्वच्छ, मोकळ्या श्‍वासोच्छ्वासाचा...अमेरिकेची राज्यघटना हीच त्याची सर्वात मोठी साक्षीदार मानावी लागेल. 

सुविख्यात चित्रसम्राट स्टीव्हन स्पीलबर्गनं सन १९९७ मध्ये या इतिहासावर आधारित एक सर्वांगसुंदर चित्रपट अगदी मन लावून निर्माण केला होता. त्याचं नावच ‘आमिस्टाड’ असं आहे. इतिहासतज्ज्ञ हॉवर्ड जोन्स यांनी ‘म्युटिनी ऑन द आमिस्टाड’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाची पानं जणू स्पीलबर्गनं जिवंत केली. हा चित्रपट बघताना गुलामांचं आयुष्य, त्यांचा छळ, वर्णविद्वेषाचा विखार, त्याला चढलेला मध्ययुगीन अमानुषतेचा रंग या साऱ्याचा एक विशाल पट उलगडत जातो. तो माणूस म्हणून कुणालाही अंतर्मुख करेल. कधीही चुकवू नये, असा हा चित्रपट आपल्याला अल्पज्ञात इतिहास शिकवतोच आणि मानवी इतिहासाच्या या रांगेत आपण कुठं उभे आहोत, त्याची चिमटेदार जाणीवही करून देतो.
* * *

ते वर्ष होतं १८३९ आणि महिना होता जूनचा. क्‍यूबाच्या बेटावरून ‘ला आमिस्टाड’ हे जहाज निघालं होतं. ‘माल’ खच्चून भरलेला होता. हा माल होता आफ्रिकी गुलामांचा. सिएरा लिऑन इथून काही आफ्रिकी गुलाम घेऊन दोन व्यापारी क्‍यूबाकडं निघाले होते. तिथल्या गुलामांच्या बाजारात ही ‘काळी माकडं’ विकायची आणि रोकड घेऊन सटकायचं, असा त्यांचा साधा-सोपा बेत होता. गुलाम खूप होते. क्‍यूबात ५३ गुलाम विकले गेले. ते विकत घेतले दोघा स्पॅनिश मळेवाल्यांनी. त्यांना अमेरिकेत आणून विकायचं ठरलं होतं; पण...

एक जुलैच्या मध्यरात्री निळ्यागर्द सागरावर जहाज हाकारलं जात असताना चिंके नावाच्या दणकट आफ्रिकी गुलामाचं डोकं फिरलं. पायातले साखळदंड उपटून काढत त्यानं हातात कुऱ्हाड घेतली. एक-दोन स्पॅनिश खलाशांना त्यानं उभ्या उभ्या फटाफट तोडलं. जहाजाच्या शिडांवर रक्‍ताच्या चिळकांड्या उडाल्या. इतर काळ्या गुलामांनीही त्याचं अनुकरण केलं. स्पॅनिश नाविकांनी घाईघाईनं ठासणीच्या बंदुका काढत काही गुलामांना उडवलं खरं; पण गुलाम संख्येनं खूप होते. बघता बघता नाविकांचा प्रतिकार थंड पडला. चिंकेनं अक्‍कलहुशारीनं फक्‍त दोघा जखमी स्पॅनिश मळेवाल्यांना जिवंत ठेवलं होतं. 

काळ्याकभिन्न गुलामांनी त्यांच्या अगम्य ‘मेंडे’ बोलीत विजयाचा जयजयकार केला; पण त्यांना जहाज कुठं हाकता येत होतं? त्यांना दिशादर्शक यंत्रही बघता येत नव्हतं अन्‌ सुकाणूही धरता येत नव्हतं.

दुर्बीणसुद्धा उलटी पकडणारी ही अडाणी माणसं होती. चिंकेनं सुऱ्याच्या टोकावर त्या दोघा स्पॅनिश मळेवाल्यांना जहाज आफ्रिकेकडं वळवायला सांगितलं. ‘आपण आता आपल्या घरी जायचं’ या कल्पनेनं आफ्रिकी गुलाम वेडावून गेले होते; पण पाताळयंत्री स्पॅनिशांनी त्या मृत्यूच्या सावटातही दगा दिला. आफ्रिकेकडं जहाज नेण्याऐवजी त्यांनी थेट अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडंच ते वळवलं. जे व्हायचं होतं तेच झालं. ‘ला अमिस्टाड’ अमेरिकी नौदलाच्या हातात अलगद पडलं. जहाजावरचा रक्‍तपात पाहून हादरलेल्या अमेरिकी कप्तानानं सगळ्या गुलामांना तत्काळ जेरबंद केलं. नवखा किनारा. नवीन भाषा. अनोळखी गोरी माणसं...आणि नवीन तुरुंग. एक बंड थंड झालं; पण विझलं नाही. अमेरिकी भूमीवर कुणालाही न्यायपालिकेसमोर उभं राहावं लागतं. जो न्याय मिळेल तो स्वीकारावा लागतो.

एका जहाजावर सुरू झालेला संघर्ष अचानक न्यू इंग्लंडच्या कोर्टात आला होता...हा खटला पुढं मानवी इतिहासातलं एक पान होईल, याची तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती.

* * *

न्यू इंग्लंडमधलेच थिओडोर जोड्‌समन हे एकेकाळचे गुलामच होते; पण नशिबाचे फासे चांगले पडले आणि थिओडोर यांच्या वाट्याला सन्माननीय आयुष्य आलं होतं. साखळदंडात बांधून न्यू हेवनच्या कारागृहात नेण्यात येणारे काळे गुलाम बघून त्यांना अपार करुणा आली. थिओडोर स्वत: कृष्णवर्णीय होते. लुईस टाप्पान नावाच्या वर्गविग्रहाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या वकिलाचे ते कनिष्ठ सहकारी होते. हा खटला ठरल्याप्रमाणे कोर्टात उभा राहणार, धनिकांच्या आग्रहाप्रमाणे चालणार आणि हे सगळे काळे गुलाम कायदेशीररीत्या मारले जाणार हे सांगायला त्यांना कुण्या भविष्यवेत्त्याची गरज नव्हती; पण यात करता येण्यासारखं फार कमी होतं. ज्यांना इंग्लिश ओ की ठो येत नाही, ज्यांच्या अंगावर धड एकही पूर्ण वस्त्र नाही, आदिमानवासारखे दिसणारे हे लोक...त्यांना त्यांची बाजू मांडणारा वकील कुठून मिळणार होता?

पण थिओडोर यांनी थोडीफार खटपट करून स्थावर-जंगमाचे कज्जे लढवणाऱ्या रॉजर शेरमन बाल्डविन नावाच्या एका तरुण वकिलाला तयार केलं. या खटल्यात पैका मिळण्याचा चान्स फारसा नव्हता; पण नाव मिळू शकतं, एवढं बाल्डविनला कळलं होतं. 

न्यू इंग्लंडच्या कोर्टात केस उभी राहिली तेव्हा बाल्डविननं ‘हे गुलाम हैवान नसून माणसंच आहेत, त्यांना आपली भाषाही समजत नाही, न्याय कसा समजणार?’ असा युक्‍तिवाद सुरू केला. अर्थातच तो टिकणं शक्‍य नव्हतं. सरकारी वकील विल्यम होलाबर्ड यांनी त्याची वासलात लावली. 

त्या कालखंडात मार्टिन व्हान ब्यूरेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचे मंत्री जॉन फोरसाइथ यांनी नवाच फाटा फोडला. आंतरराष्ट्रीय करारानुसार सदर गुलाम हे स्पेन या देशाची प्रॉपर्टी असल्यानं आपण त्यांना न्याय देणारे कोण? यामुळे स्पेनच्या राणीसाहेब हर हायनेस इसाबेला (द्वितीय) नाराज झाल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. स्पेनच्या राणीसाहेब त्या वेळी केवळ आठ-दहा वर्षांच्या होत्या आणि बाहुल्यांशी खेळत त्यांचा दिवस पार पडत असे. पेद्रो माँतेझ आणि जोसे रुईझ या स्पॅनिश नाविकांनी गुलामांच्या खरेदी-विक्रीचे दस्तावेज कोर्टासमोर पेश केले. 

खरं तर विषय इथंच संपला असता; पण वकील बाल्डविन यानं केस भलतीच मनावर घेतली. बंदरात नांगर टाकून ठेवलेल्या आमिस्टाडवर छापा मारून त्यानं सांदी-फटीत दडवलेले इतर कागद पळवले. ते दस्तावेज भलतेच स्फोटक होते.

सदर गुलाम हे आफ्रिकेतून पळवलेले नागरिक आहेत आणि ‘टेकोरा’ नावाच्या पोर्तुगीज जहाजावरून त्यांना आणलं जात होतं...नंतर त्यातल्या काही गुलामांना ठार मारण्यात आलं...काहींची विक्री झाली... उरलेल्यांची रवानगी स्पॅनिश जहाजावर झाली...सबब, हे गुलाम, हे गुलामच नसून एका स्वतंत्र देशाचे नागरिक आहेत...त्यांची इथं होणारी खरेदी-विक्री हीच मुळात बेकायदा आहे, असा युक्‍तिवाद कागदपत्रांसहित बाल्डविन यानं केला आणि एकच खळबळ उडाली. वातावरण तापलं. न्यायमूर्ती गोंधळले. राष्ट्राध्यक्ष ब्यूरेन हे तेव्हा पुन्हा निवडणुकीला उभे राहत होते. निकाल विरोधात गेला असता तर त्यांची उमेदवारी संपलीच असती. त्यांनी तातडीनं न्यायाधीशच बदलून टाकला.

हे सगळं नाट्य घडत होतं, त्यातलं एक अक्षरही त्या आफ्रिकी गुलामांना कळत नव्हतं. आपल्याला हे लोक लवकरच ठार मारणार एवढंच त्यांना कळत होतं.

मात्र, बाल्डविन यानं कमाल केली. त्यानं जेम्स कोव्ही नावाचा एक ‘माजी’ गुलाम शोधून काढला. त्याला ती आफ्रिकेतली मेंडे बोलीभाषा समजत होती. इंग्लिश अर्थातच येत होतं. कोव्हीच्या मदतीनं बाल्डविन यांनी मोठ्या परिश्रमानं चिंके या काळ्या दणकट गुलामांच्या म्होरक्‍याला बोलतं केलं. एक भयानक इतिहास सामोरा आला...चिंके सांगू लागला :- महाजनांनो, आम्ही दूरदेशीचे लोक आहोत. माझ्या गावानजीक एक दिवस काही लुटारू सैनिक आले त्यांनी आम्हाला बायका-पोरांसमवेत बंद केलं. लोंबोकोच्या किल्ल्यात डांबून ठेवलं. बायका-पोरांचं काय झालं हे काय सांगू? तिथून आम्हाला ‘टेकोरा’ जहाजावर चढवण्यात आलं. त्या जहाजावर पाणीसुद्धा मिळायचं नाही, महाजनहो! शेवटी भार जास्त होतोय म्हणून पन्नास गुलामांना समुद्रात फेकलं गेलं. उरलेले क्‍यूबात हॅवानामध्ये विकले गेले. ज्यांची विक्री झाली नाही त्यांना ‘ला आमिस्टाड’वर चढवलं गेलं. आम्ही गुलाम नाही, महाजनहो...आम्ही गुलाम नाही. आम्हाला घरी परत जाऊ द्या...’’

* * *

अमेरिकेतले सगळेच गोरे शत्रू नाहीत, हे चिंके आणि त्याच्या बंदिवान टोळक्‍याला हळूहळू समजू लागलं होतं. सरकारी वकिलांनी चिंकेची ‘स्टोरी’ कपोलकल्पित असल्याचा दावा केला; पण ब्रिटिश शाही नौदलाचा कॅप्टन फिट्‌झगेराल्डची साक्ष बाल्डविन यानं मोठ्या हिकमतीनं पेश केली. चिंके खरं बोलतोय, हे कॅप्टन फिट्‌झगेराल्डनं शपथेवर सांगितलं.

‘‘कसला किल्ला? कसला छळ? असा कुठलाही किल्ला अस्तित्वातच नाही!’’ सरकारी वकील ओरडला. त्याच्या दाव्याला चोख उत्तर काही महिन्यांनी खुद्द कॅप्टन फिट्‌झगेराल्डनंच दिलं. 

न्यू इंग्लंडच्या कोर्टानं आफ्रिकी गुलामांच्या बाजूनं निकाल दिला. एकच खळबळ उडाली. राष्ट्राध्यक्ष ब्यूरेन यांच्यावर प्रचंड दबाव आला. अखेर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं.

तिथं बाल्डविन याच्यासारख्या नवख्या वकिलाची डाळ शिजली नसती. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि निष्णात वकील जॉन क्‍विन्सी ॲडम्स यांना बाल्डविन यानं गळ घातली. एक पत्र लिहिलं : माननीय ॲडम्ससाहेब, अमेरिकेच्या भूमीवर या घटकेला दोनच हीरो उभे आहेत. एक आहे हा आफ्रिकेचा चिंके आणि दुसरे...कदाचित आपण! मानवतेला आपली नितांत गरज आहे. याल ना?’’
वार्धक्‍यानं पिकलेल्या ॲडम्ससाहेबांना बाल्डविनचं आणि थिओडोरचं खूप कौतुक होतं. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या या चळवळ्यांना त्यांचा ‘आतून’ पाठिंबा होता; पण राजकारणात मुरल्यानं त्यांनी प्रत्यक्ष सहभाग टाळला होता; पण ‘मानवतेची हाक’ त्यांनी ऐकली. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांनी केलेलं युक्‍तिवादाचं भाषण हे आजही माणुसकीचं स्वगत मानलं जातं. ते म्हणाले होते :

‘‘मायलॉर्ड, हा माणूस काळा आहे. हे आपण सारे बघतोच आहोत. पण या न्यायालयात तोच एकटा नायक म्हणून उभा आहे, हेही आपल्याला दिसायला हवं. तो गोरा असता तर आज अशा अवस्थेत इथं उभा नसता. पदकांनी आणि मानमरातबांनी त्याची छाती भरलेली असती. खांदे ताठ असते. त्याचं गुणगान गाणाऱ्या कविता रचल्या गेल्या असत्या. पोवाडे गाईले गेले असते. त्याची जीवनकहाणी आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना रंगवून रंगवून अनेकदा सांगितली असती...पण मायलॉर्ड, हा तर काळा आहे. त्याहूनही विचित्र गोष्ट म्हणजे आत्ता या क्षणी एक अत्यंत गैरसोईचा, अडचणीत आणणारा दस्तावेज माझ्या हातात आहे. त्यात लिहिलंय ः ‘सर्व मानव समान आहेत!’ काय हे?...‘समानता’, ‘समान हक्‍क’,‘जीवन’, ‘स्वातंत्र्य’ असले शब्दही त्यात आढळताहेत. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे हा, न्यायमूर्तीमहाराज...त्याचं काय करायचं? मला असं वाटतं की हाच एकमेव उपाय आहे...’ - असं म्हणत वकील जॉन क्‍विन्सी ॲडम्स यांनी दोन्ही हातांनी स्वातंत्र्याचा तो पवित्र जाहीरनामा भर कोर्टात टरकावला.

...सर्वोच्च न्यायालयातही निकाल आफ्रिकींच्या बाजूनं लागला. कोर्टातली लढाई संपली; पण इथं अमेरिकेच्या भयानक यादवी युद्धाची पहिली ठिणगीदेखील पडली.

...बाकी सारा इतिहास आहेच.

* * *

स्पीलबर्गनं हा चित्रपट अगदी मनापासून केलाय हे पदोपदी जाणवतं राहतं. त्याच्यात दडलेला एक संवेदनशील कवीसुध्दा इथं डोकावतो. स्वातंत्र्याबद्दलच्या त्याच्या उदात्त कल्पनेनं इथं असं काही प्रखर रूप घेतलं आहे की मन-मेंदू भिरभिरतो. अवघ्या ३१ दिवसांत स्पीलबर्गनं या चित्रपटाचं शूटिंग उरकलं होतं. चित्रपटात मॅथ्यू मॅक्‍नॉघी, मॉर्गन फ्रीमन, अँथनी हॉपकिन्स, ॲना पॅंकिन अशी दणदणीत स्टारकास्ट आहे. बघताना क्षणभरही कंटाळा येत नाही. या चित्रपटाचं खूप कौतुक झालं; पण त्याला ऑस्कर वगैरे नाही मिळालं. सर अँथनी हॉपकिन्स यांनी साकारलेली जॉन क्‍विन्सी ॲडम्सची व्यक्‍तिरेखा मनात कायमची घर करते. त्यांचं अखेरचं सातपानी भाषण (न्यायालयातला युक्‍तिवाद) सर अँथनी यांनी तोंडपाठ केलं आणि एका फटक्‍यात शॉट दिला. त्यांची संवादफेक, पाठांतर पाहून खुद्द दिग्दर्शक स्पीलबर्ग चाट पडला होता. त्यानंतर सर अँथनींना स्पीलबर्गनं कधीही ‘टोनी’ अशी हाक मारली नाही. या चित्रपटाची पटकथा चोरल्याचा आरोपही स्पीलबर्गवर आणि पटकथा लेखक डेव्हिड फ्रॅंझोनी यांच्यावर झाला होता. कोर्टाबाहेर सेटलमेंट झाली, असं म्हणतात. 

...दैवगतीचा खेळ पाहा, ‘आमिस्टाड’ प्रकरणाचा नायक म्हणजेच तो काळा, आफ्रिकी नायक चिंके सन १८४१ मध्ये सिएरा लिऑनला परत गेला. तिथं त्यानं व्यापार-धंदा सुरू केला. पुढची काही वर्ष तो गुलामांची विक्रीच करत होता, असं म्हणतात. हे असलं काही ऐकलं की गर्वगीताच्या समूहगानात एक नकोशी खरखर तेवढी ऐकू येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com